हमारी हिरोगीरी तो 'इसिमें' है ।

" भाई तुने तो बस अर्जुन रेड्डी बनना है । "  खरं प्रेम करतो यार तू तिच्यावर मानलं तुला, तुझ्यात आणि कबीर सिंग मध्ये तोड नाही. अपना कबीर सिंग है भाई तू । ऐक लेका, पण तू दे सोडून विषय कुठे डोक्याला खुराक! दुसरी पटवू ही गेली तर, मग तर झालं.
 प्रत्यक्ष कानावर पडलेल्या या संवादाने नकळतपणे थोडी भुवई उंचावली गेली.
  कसली 'हेरोगिरी' वाटत असेल बरं, चित्रपटातील 'अशा' पात्रांना प्रत्यक्ष आयुष्यात मूर्त स्थान देतांना ? पण त्यापूर्वी हा प्रश्न (क्वचित) तरुणांना पडला हे जरा महत्वाचं नाही का !
  त्यात लगेच कॉलर टाईट व्हावी अशातला भाग नाही पण हा प्रश्न पडण्याइतपत आपल्याला डोक्याचा भाग आहे ही जाणीव पुष्कळ.
  बरं मुद्यावरुन भटकणं नको. मला काय म्हणायचंय 'कबीर सिंग/अर्जुन रेड्डीला' एवढं डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मानस काय असावा की प्रत्यक्ष जीवनात त्यांची स्वतःशी तुलना करावी ? का ती 'हिरोगीरी' आर्टीकल 15 मधल्या 'अयान रंजन'ला किंवा थोडं मागं गेलं तर एअरलिफ्ट मधल्या 'रंजित कटियाला'ला बघून येत नाही?
  नाही, आता लगेच बरेच जण आपलं मत मांडतील की, होतो ना आम्ही त्या चित्रपटातली पात्र बघून प्रोत्साहित होतो आणि देशाप्रती, समाजाप्रती काम करण्याची ऊर्जाही आहे आमच्यात. पण.........., आणि हा पण आम्हाला 'कबीर सिंग' वर आणून सोडतो.
  म्हणजे कसं ना आम्ही देशभक्तीपर चित्रपट बघून भावुक होतो; चित्रपट संपेपर्यंत अक्षरशः देशभक्तीत, समाजभक्तीत पार बुडून जातो आणि चित्रपट बघून झाल्यावर 2-3 तासाने वर तरंगायलाही लागतो. बस तिथेच आमचा 'पण' येऊन अडतो.
  पण तोच 'अर्जुन रेड्डी' बघून आम्ही पार तो चित्रपट स्वतःच्या आयुष्याशी जोडून त्याला जणू आपलाच अविभाज्य भाग बनवू पाहतो आणि त्यात अनेकदा सफल ठरतो. हे आश्चर्यकारक!
  माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो आपण कुठेतरी विसरतोय जिथे 'कबीर सिंग' मधला 'कबीर', 'अर्जुन रेड्डी' मधला 'अर्जुन', 'फॅशन' मधल्या 'मेघना माथूर'  आणि 'शोनाली गुजरल' च्या जागी आपण स्वतःला ठेवत आहोत, तर ते फक्त त्यांच्या 'शौकीन आणि सकारण व्यसनाला अधीन गेलेल्या जीवनाला स्वतःच्या आयुष्याशी 'विनाकारण' जोडत आहोत. फक्त फिल्मी आकर्षणामुळे आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची धमक नसल्यामुळे.'
    कुठेतरी 'कबीर सिंग', 'अर्जुन रेड्डी' सर्जन असतात, महाविद्यालयीन काळातील टॉपर असतात इतकेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रासहित क्रीडा क्षेत्रातील विशिष्ट क्रीडेत प्रवीण असतात आणि स्वतःच्या प्रेमासाठी आपल्या जागी खंबीर असतात, हे तर पार आपण विसरून जातो. लक्षात ठेवतो ते फक्त प्रेम न मिळाल्यामुळे व्यसनाधीन झालेला 'कबीर' आणि 'अर्जुन'.
    कुठेतरी एका छोट्या गावातून स्वतःला फॅशन जगात सिद्द करायला मुंबईत आलेली 'मेघना'(प्रियांका चोप्रा) आपल्याला व्यसनाधीन झालेली जास्त लक्षात राहते. फॅशन जगात आपल्या मेहनतीने, कौशल्याने छाप पाडणारी 'शोनाली'(कंगना रनोट) आपल्याला कुठे दिसतच नाही. पण तिचा उद्धटपणा, व्यसनता आपल्या नजरेत उठून येतो आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपण स्वतःला तसे बनवू लागतो.
    का आपण 'अशी' हिरोगीरी करू इच्छितो जी आपल्याला आपल्या आयुष्यात 'झिरो' बनवेल? का आपण "भाई तुने तो बस अब अयान रंजन बनना है" असं म्हणत नाही ?
    चित्रपट त्याच काम करतोय आपला विरंगुळा करायचा पण कुठेतरी आपण विरंगुळा करतोय आपल्या जीवनपटाचा. ( चित्रपटातील साकारलेल्या पात्रांना प्रत्यक्ष आयुष्यात स्वतःला स्वतःशी जोडताना). शेवटी आयुष्य आपल आहे, अपनी 'हिरोगीरी' किसमे है, ये तो हमे तय करना है।

    -©प्रियंका पठाडे.

Comments

Post a Comment